मनात दडलेलं घरटं 


साफ होत चालली आहेत
जुन्या आठवणींची जळमटं
पण नाही हरवलं अजुनही
मनात दडलेलं घरटं 

साध्या सुंदर खेळांनी
अंगण जायचं दंगुन
सुरस त्या गोष्टींनी
बालपण गेलं होतं रंगुन
रम्य ते बालपण आता
सोडुन गेलंय एकटं
पण नाही हरवलं अजुनही
मनात दडलेलं घरटं 

कधी कधी रंगायचा
खेळ तो पाठशिवणीचा
आनंद होता तो वेगळाच
गाण्यांच्या भेंड्यांचा
विसरुन गेलोय खेळतानाच
भांडण ते नकटं
पण नाही हरवलं अजुनही
मनात दडलेलं घरटं 

मांडीला मांडी लावुन
पंगत होती बसत
ताटामधे खरखटं
नव्हतं कधी दिसत
प्रशस्त मोठं घर नवं
वाटु लागलंय आता खुरटं
नाही हरवलं अजुनही
मनात दडलेलं घरटं 

पिवळ्या त्या भाताची
चवच होती न्यारी
शिळी कडक भाकरी
आईला होती प्यारी
अजुनही मन हेलावते आठवुन
आईबाबांचे ते कष्ट
नाही हरवलं अजुनही
मनात दडलेलं घरटं 

घातली होती कधी
जुन्या पुस्तकांना कव्हर नवी
आठवते अजुनही आवडीची
जुन्या पानांची ती वही
आठवतात ते बाबांचे
झिजलेल्या काॅलरचे शर्ट
नाही हरवलं अजुनही
मनात दडलेलं घरटं 

लुगडे जोडुन शिवलेली
गोधडी आता विरली
मायेची ती ऊब पुन्हा
नाही कधी लाभली
उडुन गेलं कसं भुरकन
बालपण ते भुरटं
नाही हरवलं अजुनही
मनात दडलेलं घरटं 

लहानपणीच्या त्या गप्पागोष्टी
ऐकु येताहेत अस्पष्ट
पण नाही हरवलं अजुनही
मनात दडलेलं घरटं 

रचनाडाॅ. सुभाष कटकदौंडखोपोली 

About drsubhash27

Doctor...Great Fan of Mukesh. My Inspiration is my cute Daughter Anuja.
This entry was posted in कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, भावनिक कविता - Emotional Poems, मनावर कविता / Poems on mind and tagged , , , , , , , . Bookmark the permalink.

Leave a comment