भ्रष्टाचार…एक कविता I Poem on Currupion in Marathi

नाही माहित कुणाला 
कधी अन् कशी ती शिरली 
शिष्टाचारासारखी ती आता 
जन मानसात रूळली 
भ्रष्टाचाराची जुनीच किड ती
आता खोलवर रुजली 
प्रतिष्ठीत मान्यवर सारी 
चौकशीत मग सुटली 
भ्रष्टाचाराने बरबटलेले हात
त्या साऱ्यांनी धुतले 
आणि भ्रष्टाचार मिटविण्याचे 
मग शपथेवर सांगितले 
छोटे छोटे मासे ते 
लागतात कधी गळाला 
मोठ्यांना मात्र मिळते 
संधी सहज पळायला 
समाजसेवी कधी करतात 
निर्धार लढण्याचा 
पण अंदाज चुकतो त्यांचा 
स्वतःच्या ताकदीचा 
भ्रष्टाचार विरोधी खरी लढाई 
कधी लढलीच नाही गेली 
आणि न लढलेल्या लढाईची 
आता चर्चा ही थांबली
साऱ्यांच्या मनातली ती व्यथा 
माझ्या मनाला मात्र सलली 
सांत्वना अभावी कशी 
खोल काळजात रूतली 
न लढलेली लढाई बिचारी 
उपेक्षितच राहिली 
मनाच्या कागदावर फक्त 
एक कविता ती बनली…

रचना – डाॅ. सुभाष कटकदौंड- खोपोली 

About drsubhash27

Doctor...Great Fan of Mukesh. My Inspiration is my cute Daughter Anuja.
This entry was posted in मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita and tagged , . Bookmark the permalink.

Leave a comment